असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावुन अत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर
नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची
आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची
असे दांडगी ईछा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर
पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना
हसू असावे ओठांवरती काळीज काढुन देताना
संकटासही ठणकावुन सांगावे आता ये बेहत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर
करुन जावे असेही काही दुनियेतुनी या जाताना
गहिवर यावा जगास सा-या निरोप शेवट देताना
स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर
- गुरु ठाकूर
तू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे
हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी साधना करिती तुझी जे नित्य तव सहवास दे
जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना तेवत्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना धमण्यातल्या रुधिरास या खल भेदण्याची आस दे सामर्थ्य या शब्दांस आणि अर्थ या जगण्यास दे
सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती नीती ना ही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती पंखास या बळ दे नवे झेपावण्या आकाश दे
मी गेल्यावर
तुला वाटेल की आपल्या बाबांनी
वाचलियेत ही सारी पुस्तंकं
पण नाही
अर्धंही वाचता आलेलं नाहीय्
येणारही नाही हे ठाउक होतं मला तरी
मी ज़मवत गेलो होतो ही पुस्तंकं
माझ्यासाठी माझ्या बापाने
काहीच सोडलं नव्हतं मागे
ही अक्षर ओळख सोडून फक्तं
जिच्या मागे धावत मी
पोहोचलो आहे इथवर
तुला सांगण्या समज़ावण्यासाठी की
मलाही सोडता येणार नाहीय् मागे
काहीच स्थावर जंगम तुझ्यासाठी
ही काही पुस्तंकं आहेत फक्तं
जी तुला दाखवतिल वाट
चालवतिल तुला थांबवतिल
कधी पळवतिल कधी
निस्तब्धं करतिल
बोल्तं करतिल कधी
टाकतिल संभ्रमात
सोडवतिल गुंते
वाढवतिल पायाखालचा चिखल
कधी बुडवतिल तरवतिल कधी
वाहावतील कधी थोपवतील प्रवाह
अडवतिल तुडवतिल सडवतील
बडवतील हरवतिल सापडतिल
तुझ्याशी काहीही करतील
ही पुस्तंकं
तू समोर आल्यावर नेहेमीच कवेत घेउन मी माझ्यातली धडधड
तुला देण्याचा प्रयत्नं करतो
तशीच ही पुस्तंकं
उघडतील मधोमध पसरतिल हात
मिठीत घेतील तुला
आपोआप होतिल हृदयाचे ठोके
यांच्यात रहस्य् आहेत दडलेली
अनेक उत्तरंही असतील
प्रश्नांमधे कदाचित कुठेच
प्रश्नही नसतील
एक लक्षात ठेव
आपलं आयुष्यच पल्प फिक्शन कधी क्लासिक
सेल्फ हेल्प फिलॉसॉफिकल कधी कवितिक
कधी किचकट कधी सोपं असतं
लक्षात असु दे या सगळ्यात
वाईट काहिच नसतं
त्या वेळी हाती लागलेलं पुस्तक
त्याच वेळची गरज़ असतं समज़ नसतं
मी नसेन तेंव्हा ही पुस्तकं असतील
जी नेतील तुला ज़ायचं आहे तिथं
फक्तं
मी असेन
तिथं मात्रं तुला पोहोचता येणार नाही
कारण मी आधीच
होउन गेलेलो असेन तुझ्यासाठी
एखादी कथा एखादी कादंबरी
एखादी कविता एखाद्या पुस्तंकातली
माझी आठवण आली की
या प्रचंड ढिगार्यातलं
ते एखादं पु्स्तक शोध
तुझा प्रवास बघ कसा
सोपा होउन ज़ाईल.
हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन आणि कळतच नाही बोलतय कोण बोलतच नाही मुळी पलीकडे कोणी ऐकू येत रहातं फक्त डोळ्यातलं पाणी …(१) कळताच मलाही मग थोडंसं काही मीही पुढे मग बोलतंच नाही फोनच्या तारेतून शांतता वाहते खूप खूप आतून अजून काही सांगते …(२) नदी नि शेतं नि वार्याची गिरकी ढगाची विजेने घेतलेली फिरकी वाळूवर काढलेली पाण्याची चित्रं “तुझा” पुढे मी खोडलेला “मित्र” …(३) टपला नि खोड्या नि रुसवे नि राग एकदा तरी सहज म्हणून शहाण्यासारखं वाग हसायचे ढीगभर नि लोळून लोळून बोलायचे थोडेच पण घोळून घोळून…(४) वडाचे झाड आणि बसायला पार थंडीमधे काढायची उन्हात धार कॉफी घेउन थोडेसे बोलायचे कडू हसताना पहायचे येते का रडू …(५) बोलायचे गाणे आणि बोलायची चित्रं नुसतीच सही करुन धाडायची पत्रं क्षणांना यायची घुंगरांची लय प्राणांना यायची कवीतेची सय…(६) माणूस आहेस “गलत” पण लिहितोस “सही” पावसात भिजलेली कवीतांची वही पुन्हा नीट नव्याने लिहीत का नाहीस? काय रे…. काही आठवतय का नाही? शब्दसुद्धा नाही तरी कळे असे काही हातामधला हात सुद्धा जितकं बोलत नाही…(७) हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन आणि कळतच नाही बोलतय कोण दोन्ही कडे अबोला आणि मध्यात कल्लोळ छाती मधे घुसमटतात हंबरड्यांची लोळ…(८) ऐकू येतात कोंडलेले काही श्वास फक्त कोणासाठीतरी खोल दुखलेलं रक्त गरम होतात डोळे नि थरथरतो हात सर्रकन निघते क्षणांची कात…(९) उलटे नि सुलटे कोसळते काही मुक्यानेच म्हणतो “नको… आता नाही” फार नाही… चालतो मिनिटे अवघी तीन तेवढ्यात जाणवतो जन्माचा शीण तुटत गेले दोर आणि उसवत गेली वीण डोळे झाले जुने तरी पाणी नविन…(१०) हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन…. – संदिप खरे
हैय्या हो. . . .
रुपेरी वालू , सोनेरी लाटा
त्याव माझ व्हरक तरतय
कोने देशी नेऊ , कोने गावी नेऊ
सांग तुझे मनान काय घरतय. . .
गोव्याचे किना-याव , नाखवा व्हरीन नेशील का ?
निले सागरी दुनियेची सफर देशील का ?
नको बघु अस , मनी होत कस
माझे कालजान भरली रं लाज
तुझे नजरच्या जाल्यामंदी
कालीज गुतल आज
गोव्याचे किना-याव , नाखवा व्हरीन नेशील का ?
गोव्याचे किना-याव , नाखवा बेगीन नेशील ना. .
हय्या हो .. हय्या हो ..
इच्छा तुझे मनी. . येवो माझे ध्यानी
न सांगता समजल का ?
त्या गोव्याचे बाजारानु
हात हाती देशील का?
एैशे गोवे शहरान जरी नेशील संगान
एक हौस माझी पुरवाल का ?
माझे एकवीरा माऊलीच दर्शन घरवाल का ?
रुपेरी वालू , सोनेरी लाटा
त्याव माझ , व्हरक तरतय
कोने देशी नेशील , कोने गावी नेशील
सांग तुझे मनान काय चाल्लय. . .
कोने देशी नेऊ , कोने गावी नेऊ
सांग तुझे मनान काय घरतय. . .