Tuesday, 28 May 2019

असे जगावे

असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावुन अत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची
आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची
असे दांडगी ईछा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

पाय असावे जमिनीवरती  कवेत अंबर घेताना
हसू असावे ओठांवरती काळीज काढुन देताना
संकटासही ठणकावुन सांगावे आता ये बेहत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

करुन जावे असेही काही दुनियेतुनी या जाताना
गहिवर यावा जगास सा-या निरोप शेवट देताना
स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर
- गुरु ठाकूर

No comments:

Post a Comment

तु असतीस तर

तु असतीस तर झाले असते सखे उन्हाचे गोड चांदणे मोहरले असते मौनातुन एक दिवाने नवथर गाणे बकुळुच्या फुलापरी नाजुक फुलले असते गंधाने...

Popular Posts